तुमची रेल्वे ट्रेन कुठे आहे, पाहा आता मोबाईलवर

९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे.

Updated: Oct 13, 2012, 06:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे. तुमची ट्रेन नेमक्या वेळेस, नेमकी कुठे आहे हे आता मोबाईलच्या एका क्लीकसरशी समजणार आहे. सेंट्रल फॉर रेल्वे इन्फरमेशन सिस्टिम (सीआरआयएस) या हिंदुस्थानी रेल्वेच्या आयटी विभागाने गुगल मॅपच्या सहकार्याने रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेल रडार’ नावाचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला तुमच्या ट्रेनचे ठिकाण नकाशासह धावत्या लोकलचे निश्‍चित स्थान दृश्य माध्यमातून दिसणार आहे. बर्‍याचदा काही ना काही कारणांमुळे ट्रेन उशिरा धावतात त्यामुळे प्रवाशांना रखडत राहावे लागते.तसेच बाहेरगावाहून येणार्‍या ट्रेन नेमक्या कुठे रखडल्या आहेत याचा प्रवाशांना पत्ता लागत नसल्याने त्यांची गोची होत असे. परंतू रेल्वेने आता यावर तोडगा शोधून काढला आहे.
रेल्वेने आता रडार यंत्रणा उभारली असून त्यामुळे बसल्या जागी आता मोबाईलवर प्रवाशांना गाडी नेमकी कुठे रखडली आहे याची माहिती मिळणार आहे. यामुळे होणारी प्रवाशांची गैरसोय आता एका क्लिकमुळे कमी होऊ शकते.
http://railradar.trainenquiry.com/ वर गुगल मॅपच्या मदतीने स्थानक आणि ट्रेनची माहिती एका क्लिकवर पाहावयास मिळणार असून नेटधारकांना धावत्या लोकलचे स्टेटस, लोकेशन,रूटस् आणि थांब्याची स्थानके कळतिल. दर पाच मिनिटांनी रेल रडार अपडेट होत राहील.