www.24taas.com, मुंबई
पावसाळ्यात मोबाईलचा बचाव करण्यासाठी प्लास्टिकचं कव्हर वापरता... उन्हाळ्यात हाताला घाम येऊनही मोबाईल ओला होऊ नये, म्हणून टिश्यू पेपर वापरता... आणि पाण्यात काम करताना किंवा आंघोळ करताना तर आलेला कॉल घेणंही टाळता... असंच काहीसं तुम्हीही करत असाल ना! तुमच्या मोबाईलला पाण्यापासून वाचवण्यासाठी... पण, आता मोबाईल ओला झाला तर... अशी सतत चिंता करणं विसरा. कारण, सोनी कंपनी बाजारात आणतेय एक वॉटरप्रुफ मोबाईल...
‘एक्सपिरीया झेड’ नावाचा हा मोबाईल वॉटरप्रुफ आणि डस्ट रेझिस्टंट असेल, अशी ओळखच कंपनीनं एक्सपीरीया सिरीजमधील पुढच्या मॉडेलची घोषणा करताना करून दिलीय. अमेरीकेतील लासवेगास येथे सुरु असणा-या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो (सीइएस)मध्ये कंपनीनं ही घोषणा केलीय. त्यामुळे पावसात किंवा अगदी आंघोळ करतानाही तुम्ही मनसोक्त गप्पा मारू शकाल.
१.५ गिगा हर्ट्स स्नॅपड्रॅगन एस फोर प्रो क्वाड- कोअर प्रोसेसर, ५ इंच हाय डेफिनेशन टच स्क्रीन, १९२० X १०८० रिझल्यूशन, ४.१ इका जेली बीन सिस्टीमवर चालणारा फोन, वॉटरप्रुफ आणि डस्ट रेझिस्टंट, दोन जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट मेमरी (३२ जीबी वाढवता येणं शक्य), फोर जी / एलटीई बॅण्ड हायस्पीड इंटरनेट सपोर्ट, १३.१ मेगापिक्सलचा कॅमेरा, २.२ मेगापिक्सल फ्रण्ट - फेसिंग कॅमेरा अशी सगळी फिचर्स या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील.
‘एक्सपिरीया झेड’ अजून भारतात दाखल झाला नसला तरी तो लवकरच आयफोन ५, मोटोरोला रेझर, सॅमसंग गॅलक्सी एस थ्री सारख्या स्मार्ट फोनच्या शर्यतीत दाखल होणार आहे. भारत ही मोबाईल ग्राहकांसाठी महत्त्वाची बाजारपेठ ओळखली जाते. त्यामुळे तो लवकरच भारतातही दाखल होईल. या मोबाईलची भारतातील किंमत ३५ हजारांपर्यंत असण्याची शक्यता आहे.