www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केलीय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत अडीच कोटींपेक्षा जास्त असल्याचं समजतंय. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
मुंबई-गोवा हायवेजवळ सरकारी विश्रामगृह परिसरात एका फोर्ड गाडीची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जवळपास चार किलो हेरॉईन (केटामाईन) जप्त केलं आहे.
चिपळूणमध्ये अंमली पदार्थांचा मोठा आल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं परिसरात झाडाझडती सुरू केली होती. चिपळूण पोलिसांना सोबत घेऊन रात्री दहाच्या सुमारास त्यांना विश्रामगृहाजवळच पाच तरुण संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांना पाहून त्यांनी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना अडवलं आणि गाडी तपासली. यावेळी, त्यांना हे अंमली पदार्थ सापडले.
सागर महाडिक (26), मंगेश चाळके (33), निमेश चव्हाण (26), दीपक खोराडे (29) आणि दीनेश खोराडे (28) अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.