www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर १५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो-रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पंतंगे यांनी दिली.
कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेला २६ जानेवारी २०१४ रोजी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. २६ जानेवारी १९९९ रोजी या सेवेला प्रारंभ करण्यात आला होता. मालवाहतूक हा कोणत्याही रेल्वे सेवेचा आर्थिक कणा समजला जातो. त्यामुळे कोकण रेल्वेने रो-रो सेवेला प्रारंभ केला. कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात मालवाहतुकीला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, कालांतराने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या १५ वर्षांत तब्बल साडेतीन लाख ट्रक या रो-रो सेवेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचविले आहेत. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, असे पतंगे यांनी सांगितले.
रो रो सेवा वाढीसाठी आधी कोकण रेल्वेने सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या; त्याशिवाय ट्रकचालक जेवणासाठी थांबत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक धाब्यांच्या ठिकाणी मराठी, हिंदी, पंजाबी व गुजराती भाषेत पत्रके वाटली, मालवाहतूकदारांशी संपर्क साधून त्यांना या सेवेबाबत माहिती दिली. पहिल्या दिवशी केवळ पाच ट्रकचालक या सेवेचा लाभ घेण्यासाठी आले होते; मात्र दिवसेंदिवस या सेवेची प्रसिद्धी ट्रकचालकांमध्ये होऊ लागली. रेल्वे प्रशासनाने या सेवेत सातत्याने चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे पतंगे यांनी स्पष्ट केले.
कमी अंतरावरील ठिकाणासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. जास्तीत जास्त मोकळ्या रेक उपलब्ध करून देण्यात आल्या. सध्या दररोज तीन रेकद्वारे ही सेवा पुरविली जात आहे. एका रेकमध्ये ५० ट्रक ठेवण्यात येतात. तीन रेकच्या माध्यमातून सुमारे १५० ट्रकना या सेवेचा लाभ होत आहे. या सेवेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण काहीसा कमी झाला आहे. गाडीची कमी झीज, इंधन बचत, वेळेची बचत, मालाची जलद वाहतूक आणि चालकांना तणावरहित प्रवास या सर्वांमुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी रस्त्यामार्गे जाण्यास २४ तास लागत, तिथे रो-रो सेवेमुळे केवळ १२ तासांत पोहोचता येते तर काही ठिकाणी ४० तास लागत, तिथे २२ तासांत पोहोचता येत आहे, अशी माहिती वैशाली पतंगे यांनी दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.