www.24taas.com,नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पुन्हा राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची निवड झाली आहे. सागर नाईक यांनी शिवसेनेचे सतीश रामाणे यांचा पराभव केला. नाईक यांना ५८ मतं मिळाली, तर रामाणे यांना फक्त १५ मतं मिळाली.
महापौरपदासाठी आज फेरनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. याआधी ९ नोव्हेंबरला महापौरपदाची निवडणूक झाली होती. महापौरपद हे ओबिसींसाठी राखीव आहे. एकाही उमेदवारानं जात पडताळणीचा अर्ज दाखल न केल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
सागर नाईक यांचा अर्ज बाद झाल्यानं ठाण्याचे पालकमंत्री आणि सागर यांचे काका गणेश नाईक यांची नाचक्की झाली होती. मात्र सागर नाईक यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आणि बाजीही मारली.
९ नोव्हेंबरची निवडणूक बेकायदा स्थगीत केल्याची याचिका विरोधकांनी दाखल केली होती. मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली. तसेचं चुकीची माहिती दिल्यावरून काँग्रेसचे अमित पाटील यांना १५ हजारांचा दंडही ठोठावला. तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना महत्व आले होते. आज कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रवादीने पुन्हा सत्ता हाती राखली आहे.