ठाण्याजवळ आव्हाडांचा रेलरोको; प्रवासी वेठीला

ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 5, 2012, 11:05 AM IST

www.24taas.com, ठाणे
ठाणे ते कळवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ‘रेले रोको’ आंदोलन केलंय. मफतलाल झोपडपट्टी वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय.
या ‘रेल रोको’मुळे मध्य रेल्वेमार्गावरील दोन्ही बाजुंची लोकल वाहतूक ठप्प झालीय. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केल्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं रखडलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल होत असतानाच आज हा रेल्वे रोको करून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनानं प्रवाशांना वेठीला धरलंय. ठाणे महापालिका आज मफतलाल झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करणार आहे. त्यापूर्वीच आव्हाडांनी हे रेल रोको आंदोलन केलंय. आज सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झालीय.
आव्हाड यांनी केलेल्या रेले रोको आंदोलनाचा मध्य रेल्वेला मात्र मोठा फटला बसलाय. या आंदोलनामुळं मध्य रेल्वेच्या तब्बल 100 लोकल्स रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज दिवसभर प्रवाशांचे मोठया प्रमाणावर हाल होण्याची शक्यता आहे. पावसामुळं गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे हाल सुरू असतानाच आव्हाडांच्या आंदोलनानं प्रवाशांना वेठीला धरल्यानं प्रवासी पुरते वैतागले होते. यावर प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.