www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भरदिवसा दरोडा पडलाय. दापोली तालुक्यात पाणी मागण्याच्या बहाण्याने दरोडा टाकण्यात आला. याआधी रत्नागिरीतील जाकादेवी येथे बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्याचे सत्र सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. २० ते २५ वयोगटातील तरूणांनी हा दरोडा टाकला. दरोड्याच्यावेळी महिलेचे हात-पाय बांधून लाखाचा ऐवज लंपास करण्यात आलाय.
पाणी मागण्याच्या बहाण्याने पिसई येथील लक्ष्मी सुधीर खताते (५५) यांचे पती बुधवारी सकाळी नऊ वाजता कामानिमित्त दापोलीला गेले होते. त्यामुळे लक्ष्मी या घरात एकट्याच होत्या. घराचा दरवाजा बंद करून त्या घरातच काम करीत होत्या. सकाळी १०.३० वाजता एका अनोळखी तरूणाने आजी अशी हाक मारून त्यांचा दरवाजा ठोठावला.
लक्ष्मी यांनी दरवाजा न उघडता अंदाज घेतला. यावेळी एक व्यक्ती दारात, तर अन्य दोघेजण कंपाऊंडच्या गेटजवळ उभे होते. दरवाजाबाहेरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. चौकशी दरम्यान त्याने आपण मुंबईहून आलो असून, बुरोंडीला निघाल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून पाणी दिले.
तांब्याभर पाणी आणल्यानंतर त्या अनोळखी तरूणांने माझे मित्र आहेत, असे सांगून कळशीभर पाण्याची मागणी केली. यावेळी लक्ष्मी या पाठिमागे वळताच त्यांने मित्रांना इशारा केला. कळशी देण्यासाठी दरवाजा उघडला असता दरवाजातील ती व्यक्ती घरात घुसली व त्याने तत्काळ खताते यांच्या तोंडावर रुमाल बांधला. यावेळी अन्य दोघांनी घरात घुसून खताते यांचे हात फडक्याने, तर पाय घरातीलच वायरने बांधले. त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.
त्यांना दमबाजी करत कपाटाची चावी घेतले. कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रुपये सात हजार ८०० काढून घेतले. त्यानंतर या तीन चोरट्यांनी तेथून पोबारा केला. जाताना त्यांनी घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. या दरोड्यानंतर चिपळूणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.