अमोल पाटील, www.24taas.com, कर्जत
माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्ये रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. शनिवारपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केलीय. मागील 40 वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मागणी अखेर पूर्ण झालीय.
मुंबईपासून जवळ असलेलं आणि देशभरातल्या पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे माथेरान. आता इथपर्यंत पोचण्यासाठी पायपीट करण्याचीही गरज पडणार नाही. तसंच स्थानिकांचीही पायपीट वाचणार आहे. अनेक चाचण्यांनंतर माथेरान ते दस्तुरी अमन लॉज दरम्यान शटल सेवा करण्यात आलीय. यामुळे विद्यार्थी, कामगार, व्यापारी यांच्यासह रूग्णांना मोठा आधार मिळणार आहे. ही शटल सेवा दिवसातून पाच फेऱ्या मारणार आहे. याचा पर्यटनाच्या वाढीसाठीही फायदा होणार आहे.
नागरिकांनी मागील चाळीस वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न अखेर साकार झालंय. परिणामी आगामी काळात पर्यटनाचा विकासही वेगानेच होईल अशी अपेक्षा केली जातेय.