ठाण्याची निवडणूक स्थायी; पक्षांचं चित्त नाही ठायी

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2012, 09:42 AM IST

www.24taas.com, ठाणे
ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
लोकशाही आघाडी गटातर्फे अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रविंद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आलीय. लोकशाही आघाडी गटात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, आणि अपक्षांचा समावेश आहे. तर महायुतीच्या वतीनं बसपाच्या विलास कांबळेंना उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीत शिवसेना, भाजप, बसपा आणि अपक्षांचा समावेश आहे. निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपल्या आठही सदस्यांना अज्ञात स्थळी रवाना केलंय. स्थायी समिती पदासाठी आघाडीतर्फे जरी काँग्रेसच्या फाटकांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी फाटकांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे नारायण पवार, मनसेचे सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गणेश साळवी नाराज झाले आहेत. त्यांच्यापैकी काँग्रेसच्या नारायण पवारांना मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलवून घेतलं होतं. या नाराजीची कल्पना असल्याने आघाडीच्या गटनेत्यांनी व्हिप बजावलाय. मात्र, नाराज असलेले नेते नेमकी काय भूमिका घेणार, यावर निर्णय अवलंबून असेल. कायदेशीर कारवाईच्या दबावतंत्राचा वापर करण्यात येत असला तरी केवळ पक्षाचा आदेश मानणार असल्याचं संजय भोईर यांनी म्हटलंय.
आघाडी आणि युती दोघांचेही समसमान सदस्य असल्यानं, कोणा गैरहजर राहिल्यास दुसऱ्या बाजूला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, जर सर्वांनी इमाने-इतबारे मतदान केलं तर चिठ्ठीद्वारे स्थायी समिती ध्यक्षपदाची निवड होऊ शकते.
एक नजर टाकूयात... ठाण्यात स्थायी समितीत लोकशाही आघाडी आणि महायुतीच्या बलाबलावर...
- ठाणे मनपाच्या स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत.
- लोकशाही आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे - ५, काँग्रेसचे – २ तर मनसेचा – १ सदस्य
- महायुतीमध्ये शिवसेनेचे – ६, भाजपचा – १ तर बसपाचा – १ सदस्य
दोन्ही बाजूंचं संख्याबळ समसमान असल्यामुळे जर या निवडणुकीत सर्वांनी आपापल्या पक्षाशी निष्ठा राखून मतदान केलं तर चिठ्ठी काढून अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.