ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स

ठाणे महापालिकेच्या कोपरी आणि मुंब्रा भागात झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स झालंय... याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक पुन्हा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ समसमान राहिलंय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2013, 11:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेच्या कोपरी आणि मुंब्रा भागात झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा टाय टाय फिस्स झालंय... याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक पुन्हा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ समसमान राहिलंय... परिणामी ठाणे महापालिकेतील सत्ता समीकरणही बदललेलं नाही...
ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील प्रभाग 51 अ मध्ये भाजपच्या रेखा पाटील यांनी विजयाचा झेंडा फडकवला आणि एकच जल्लोष सुरू झाला... रेखा पाटील यांनी काँग्रेसच्या अरूणा भुजबळ यांचा 3 हजार 221 मतांनी दणदणीत पराभव केला. भाजपच्या या आनंदोत्सवात शिवसेनेचे नेतेही सहभागी झाले होते. केवळ भाजपचा एक नगरसेवक वाढला म्हणून हा आनंद नव्हता, तर ठाणे महापालिकेतील सत्तेचे समीकरण बदलले नाही, यासाठीचा हा सुटकेचा निःश्वास होता. पाटील यांच्या विजयामुळे पालिकेतील महायुतीचे संख्याबळ पुन्हा 65 वर पोहोचलेय.
तर मुंब्र्यातील प्रभाग क्र. 57 ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वनाथ भगत यांनी समाजवादी पार्टीचे शेख अकबर अली यांचा 2324 मतांनी पराभव केला. भगत यांच्या विजयामुळे ठाणे महापालिकेतील आघाडीचे संख्याबळही 65 वर पोहोचले आहे.
कोपरी प्रभागात भाजप नगरसेविकेच्या विजयामुळे आमदार एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन वाढलंय, तर काँग्रेसतर्फे आमदारकीसाठी इच्छूक असलेले रवींद्र फाटक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
ठाणे महापालिकेच्या सत्तेचं समीकरण बदलवणारी निवडणूक म्हणून या पोटनिवडणुकांकडे पाहिलं जात होतं. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार पुन्हा एकदा विजयी झाल्याने ठाणे महापालिकेतील संख्याबळ कायम राहिलेय. परिणामी तूर्तास तरी शिवसेनेचा महापौर ठाण्यात कायम राहणार असला तरी वर्षभरानंतर होणारी महापौरपदाची आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.