अंधश्रद्धेतून जाणार होता जुळ्या बहिणींचा जीव!

पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींचा अंधश्रद्धेतून बळी दिला जाणार होता... पण जागरूक गावकऱ्यांमुळे आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या हस्तक्षेपामुळे या मुलींचा जीव वाचलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 10, 2013, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पनवेल
पनवेल तालुक्यातील औला गावात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींचा अंधश्रद्धेतून बळी दिला जाणार होता... पण जागरूक गावकऱ्यांमुळे आणि ‘प्रथम’ या संस्थेच्या हस्तक्षेपामुळे या मुलींचा जीव वाचलाय. या मुली कंबरेपासून एकमेकींना जोडल्या गेल्या आहेत.
पनवेल तालुक्यातील औला गावात जन्मलेल्या सयामी जुळ्या मुलींना गावकऱ्यांच्या मदतीने सोमवारी सकाळी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अंधश्रद्धेचा पगडा असलेल्या शालूच्या पतीनं-अरुणनं मुंबईहून बीडमधल्या एका तांत्रिक-मांत्रिकाशी दूरध्वनीहून संवाद साधला. त्यानुसार या मुलींचा गुरुवारच्या अमावस्येच्या रात्री बळी द्यायचे ठरले. शालू आणि दोन्ही मुलींना घेऊन अरुणनं सोमवारी पुन्हा गाव गाठले. मात्र, अरुणची ही संशयास्पद वागणूक गावकर्यांंना खटकली. त्यानंतर जागरूक गावकर्यां नी मुंबईतल्या ‘प्रथम’ या संस्थेशी संपर्क साधला.
‘प्रथम’च्या प्रतिनिधींनी जुळ्या मुलींचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अरुण दोन्ही मुलींना घेऊन पसार होऊ नये म्हणून त्यांनी मंगळवारी रात्री पनवेल एसटी आगारामध्ये सापळा रचला. शिवाय गावकऱ्यांनाही त्याच्यावर पाळत ठेवण्याची विनंती केली. या खबरदारीमुळे मुलींना घेऊन पळून जाण्याचा अरुणचा प्रयत्न फसला.

त्यानंतर ‘प्रथम’च्या सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी अरुणचे दोन ते तीन तास समुपदेशन केले. हा ‘देवीचा कोप’ अथवा तत्सम घटना नाही, हे त्याला पटवून दिले. त्यामुळे या जुळ्या मुलींचा जीव वाचला असून, संस्थेने त्या आई आणि शरीरानं जोडल्या गेलेल्या दोन्ही जुळ्या बहिणींना बुधवारी परळमधील वाडिया रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयाने आता जुळ्या मुलींची तपासणी सुरू केली आहे. या दोघींच्या किडणीसह इतर अवयवांची तपासणी केल्यानंतरच दोन आठवड्यांनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.