www.24taas.com, नागपूर
पटपडताळणीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना इतरत्र समाविष्ट करून घेईपर्यंत शिक्षक भरतीवर घालण्यात आलेल्या बंदीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारवर टीका केल्यानंतर शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे गुरुवारी विधान परिषदेत आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची तातडीने भरती करा, अशी मागणी विरोधकांनी केली
रामनाथ मोते, विनोद तावडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. बंद होणा-या शाळांमधील अतिरिक्त शिक्षक इतर शाळांत समाविष्ट केले जाणार आहेत, पण ही प्रक्रिया सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळा बंद होईल तेव्हा होईल, पण भरती तर सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली.
त्यावर शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी ताबडतोब शिक्षक भरती झाली पाहिजे हे मान्य केले, पण सरकारच्याच अध्यादेशानुसार समायोजन होईपर्यंत भरती करता येत नसल्याचे सांगितले. तरीही कॅबिनेटसमोर हा विषय मांडून निर्णय घेऊ, असे आश्वासन खान यांनी दिले.
त्यावर विक्रम काळे यांनी कुठलीही शाळा तातडीने रद्द करता येत नाही. मग तोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही का? आज अनेक शाळांत माध्यमिक शिक्षक नाहीत, असे सांगितले. त्यावर चर्चेत हस्तक्षेप करीत दर्डा यांनी समायोजनाचे काम खोळंबल्याचे मान्य केले आणि समायोजनाच्या नोटिसा देण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.