मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं नेपाळ भूकंप पीडितांच्या मदतीसाठी दोन दिवसांमध्ये एक करोड डॉलरहून अधिक निधी जमा केलाय... हा खरं तर एक प्रकारे नवा रेकॉर्डच आहे...
नेपाळमध्ये 25 एप्रिल रोजी आलेल्या 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक बळी घेतलेत. तर 10 हजारांहून अधिक जण जखमी आहेत.
फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यानं फेसबुकच्या आपल्या अकाऊंटवर या निधीचा उल्लेख केलाय. 'आम्ही फेसबुकच्या होम पेजवर लोकांसमोर नेपाळ भूकंप पीडितांना मदतीचं आवाहन केलं... आणि दोन दिवसांतच 50 लाखांहून अधिक लोकांनी मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी एक करोड डॉलरहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात मदत केलीय' असं झुकरबर्गनं म्हटलंय.
'फेसबुकदेखील भूकंप प्रभावित क्षेत्रातील लोकांच्या मदतीसाठी अतिरिक्त २० लाख डॉलर मदत म्हणून देणार' असल्याचंही झुकरबर्ग यानं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, फेसबुकनं भूकंपाच्या सुरक्षेच्या दिशेनं एक सुरक्षा फीचरही तयार केलंय. यानुसार, नेपाळच्या ७० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित चिन्हित करण्यात येतंय. वेगवेगळ्या समुदायाच्या लोकांनी एकत्र येऊन गरजवंतांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचंही झुकरबर्गनं कौतुक केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.