मुंबई : आपल्या प्रोडक्ट आणि त्यांच्या किंमतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या अॅपलनं नुकताच एक ४ इंचाचा स्मार्टफोन लॉन्च केलाय. iPhone SE असं या फोनचं नाव आहे.
या फोनची भारतात किंमत ३९,००० रुपये असणार आहे. परंतु, हा फोन बनवण्यासाठी कंपनीला केवळ १०,५७४ रुपयांचा खर्च आलाय... तरीही जवळपास तिप्पट नफा कंपनी या फोनच्या विक्रीमधून कमावतेय, असा खुलासा नुकताच संशोधन संस्था 'आयएचएस'नं केलाय.
अमेरिकेत iPhone SE ची किंमत ३९९ डॉलर आहे. इथं कंपनी जवळपास प्रत्येक मोबाईलमागे २५९ डॉलर्सचा नफा कमावतेय. अशात, भारतीय बाजारात हा फोन विकून ही कंपनी आणखी नफा कमावणार आहे. कारण अमेरिकेच्या तुलनेत भारतात या फोनची किंमत अधिक आहे.
आयएचएस ही एक संशोधन संस्था आहे. प्रत्येक स्मार्टफोनचे भाग वेगवेगळे करून त्याचं मूल्य जाणून घेण्याचा ही संस्था प्रयत्न करते. यालाच 'टियरडाऊन'ही म्हटलं जातं. नुकतंच या कंपनीनं सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन 'गॅलक्सी एस७'ची किंमत १७,१६० रुपये असल्याचा खुलासा केला होता.
उल्लेखनीय म्हणजे, आयएचएसनं केवळ स्मार्टफोनच्या वेगवेगळ्या भागांच्या किंमतींचा विचार केलेला आहे. परंतु, स्मार्टफोन बाजारात येईपर्यंत यामध्ये रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट, लेबर कॉस्ट, मार्केटिंग चार्ज आणि सप्लायशी निगडीत अनेक खर्चांचा समावेश होतो. त्याचा विचार मात्र यात केलेला नाही.