नवी दिल्ली : फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत...
यंदाच्या वर्षातील पहिल्या सहामाहीचे हे आकडे तर हेच सांगत आहेत. फेसबुकनं एका अहवालात हे आकडे जाहीर केलेय. सोबतच २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या देशांच्या सरकाराकडून यूजर डेटा मागवण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.
जवळपास दोन वर्षांपासून फेसबुकनं अशा प्रकारच्या मागण्यांचा खुलासा करणं सुरू केलंय. भारत आणि टर्की या देशांमध्ये सर्वात जास्त स्थानिक कायद्यांचं उल्लंघन करणारे कमेंटस् हटवण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय.
भारताकडून पहिल्या सहामाहित तब्बल १५,१५५ पोस्ट हटवण्यात आल्याचं फेसबुकनं म्हटलंय. २०१४ सालच्या आकड्यापेक्षा हा आकडा तिप्पट मोठा आहे.
तर टर्कीमध्ये गेल्या वर्षी ३,६२४ पोस्ट हटवण्यात आल्या होत्या, तर यंदा हा आकडा ४,४९६ वर पोहचलाय.
हटवण्यात आलेल्या कॉन्टेन्टमध्ये जर्मनीच्या नाझी प्रॉप्रगंडापासून हिंसक कृत्यांच्या चित्रणाचाही समावेश आहे. साधारणत: सरकारकडून बेसिक सबस्क्रायबर माहिती, आयपी अॅड्रेस किंवा अकाऊंट कन्टेन्टची माहिती मागितली जाते. यामध्ये लोकांच्या ऑनलाईन पोस्टचाही समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी फेसबुकचा यूझर बेस १४० करोड होता तो आता १५५ करोडवर पोहचलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.