मुंबई : स्वत:लाच आजमावून पाहण्याचा अट्टहास अखेर तिने पूर्ण केलाय. पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास तिनं एकटीनं सायकलवर १९ दिवसांत पूर्ण केलाय.
प्रिसिलिया धनंजय मदन असं या २२ वर्षीय साहसवेड्या तरुणीचं नाव... गेल्या महिन्यात २४ तारखेला प्रिसिलियानं आपला हा प्रवास सुरु केला होता.
सध्या 'मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स'चा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रिसिलियानं आपल्या या प्रवासा अगोदर बरीचशी तयारीही केली होती. त्यामुळे, आपण हा प्रवास पूर्ण करणार यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिचा हाच विश्वास आणि तिच्या या प्रवासात तिला प्रोत्साहन देणारे अनेक जण आपल्याला प्रिसिलियाच्या 'I P'ride' नावानं फेसबुकवर तयार पेजवरून भेटतात. फेसबुकचं हे पान म्हणजे प्रिसिलियाची डिजीटल डायरीच आहे. आपल्या प्रत्येक दिवसाची, प्रवासाची, भेटलेल्या व्यक्तींचा उल्लेख प्रिसिलियानं आपल्या या डायरीत केलाय.
उल्लेखनीय म्हणजे, १८ रात्र आणि १९ दिवसांच्या या १८०० किलोमीटरच्या प्रवासात प्रिसिलिया कोणत्याही हॉटेलमध्ये राहिली नाही. या संपूर्ण प्रवासात ती ज्या व्यक्तींना भेटली त्यातल्या अनेक व्यक्ती तिला पहिल्यांदाच भेटल्या होत्या. पण, या संपूर्ण प्रवासात मला कधी एकटं किंवा असुरक्षित वाटलं नाही, असं तिनं म्हटलंय.
यापूर्वी प्रिसिलियानं कुल्लू ते खारदुंग ला असा ६०० किलोमीटरचा प्रवासही सायकलवर पूर्ण केलाय. प्रिसिलियाला अशा प्रवासांचा वारसा घरातूनच म्हणजे तिचे वडील धनंजय मदन यांच्याकडून लाभलाय. तिच्या आई-वडिलांची साथ तिच्यासोबत कायम राहिलीय.