आजपासून १०० वर्षांपूर्वी ११ मे १९१२ रोजी लुधियाना जिल्ह्यातील समराला गावी खानदानी बॅरिस्टरच्या घरात जन्म झाला सआदत हसन मंटोचा... पिढीजात बॅरिस्टर्सच्या घरात जन्म घेऊनही मंटो वकील बनला नाही, मात्र त्याला वारंवार कोर्टाची पायरी चढावी लागली. असा कोण होता मंटो?
गेलं सबंध शतक ज्याच्या लेखणीने हादरून गेलं, शहारून उठलं.. तो सआदत हसन मंटो. एक अतिसंवेदनशील आणि खरा लेखक.. आपल्याला आलेल्या अनुभवांना, सुचलेल्या कल्पनांना कुठलीही भीडभाड न बळगता ज्याने जगासमोर मांडलं तो मंटो... केवळ सेक्स, वेश्या यांच्यावर लिहिणारा लेखक म्हणून जगाने ज्याला बदनाम केलं, तरीही तो अत्यंत प्रभावशाली, प्रामाणिक आणि महान लेखक आहे हे सत्य कुणीही नाकारू शकलं नाही.
वडील अत्यंत कडक. मंटो मात्र वाया जात चाललेला उनाड पोरगा. अभ्यासात काडीचाही रस नसलेला. उर्दू साहित्यातला महानतम कथाकार मंटो हा परीक्षेत दोनदा नापास झाला, तो उर्दू विषयातच. एकीकडे नाटक आणि वाचन यांची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाचं इतकं वेड होतं त्याला की लहानपणी अमृतसर स्टेशनवरील पुस्तकांच्या स्टॉलवरून एक इंग्रजी पुस्तक चोरताना त्याला पकडलं होतं. मित्रांबरोबर त्याने नाट्य संस्थाही सुरू केली होती, पण काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी येऊन तिथल्या सामानाची तोडफोड करत ‘असले धंदे ताबडतोब बंद’ करण्याची धमकी दिली.
अमृतसरच्या मुस्लिम हायस्कूलमध्ये शिकत असताना मंटोच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली ती अमृतसरमधीलच जालियनवाला बागेतील हत्याकांडाची घटना. त्यावेळी मंटोचे वय वर्ष होतं अवघं ७. याच घटनेची परिणती मंटोच्या पहिल्या वहिल्या कथेत झाली. या कथेचं नाव होतं ‘तमाशा’. या लघुकथेत जालियनवाला बागेतील हत्याकांडाचं एका ७ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून दर्शन घडतं.
भारतात ब्रिटीशविरोधात वातावरण तापत चाललं होतं. अशात लहानग्या मंटोच्या मनावर क्रांतीकारी, साम्यवादी विचारांनी परिणाम करायला सुरूवात केली. १९३२ साली वडिलांच्या म़ृत्यूपश्चात त्यांच्या फोटोखाली भगतसिंगची मूर्ती त्याने ठेवली होती. साम्यवादी लिखाणावरील प्रेमापोटी आणि अब्दूल बारी यांच्या आग्रहाखातर मंटोने व्हिक्टर ह्यूगोच्या ‘द लास्ट डेज़ ऑफ़ अ कंडेम्ड’ या पुस्तकाचं ‘सरगुजश्त-ए- असिर’ हे उर्दू रुपांतर केलं. लाहोरवरून ते प्रकाशित झालं. तसंच 'रुसी अफसाने' हे उर्दू भाषांतरीत पुस्तक लिहीलं. आतापावेतो उर्दू साहित्यात मंटोचं नाव होऊ लागलं होतं.
बाविसाव्या वर्षी पुन्हा कॉलेजचा रस्ता पकडून मंटोने शिक्षण घ्यायला सुरूवात केली. मुस्लिम यूनिव्हर्सिटीत काही दिवस शिक्षण ही घेतलं. पण पूर्ण नाहीच केलं. याच सुमारास काही मासिकांत ‘इन्कलाब पसंद’ या नावाने लघुकथा लिहीण्यास सुरूवात केली.
ऑल इंडिया रेडिओ
मुळातच उनाड असणाऱ्या आणि आपल्या सावत्र भावांकडून मिळणाऱ्या वागणुकीने वैतागलेला मंटो लाहोरला निघून गेला. तिथे ‘पारस’, ‘मुसव्विर’ या मासिकांत संपादकीय कामाकरता रुजू झाला. १९४१ साली दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये मंटोला लेखकाची नोकरी मिळाली. त्या दिवसांत मंटोने साहित्य जगताला कथांचा खजिना दिला. 'मंटो के ड्रामे', 'आओ...', 'जनाज़े', 'तीन औरते', 'धुवाँ 'इत्यादी लघुकथा त्याने लिहील्या. पण १७ महिन्यांतच ही नोकरी