शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची वेगळी बाजू!

मंदार मुकुंद पुरकर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता.

Updated: Jan 10, 2012, 11:24 PM IST

मंदार मुकुंद पुरकर

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्या आग्रा दरबाराला दिलेली भेट आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतेपर्यंतच्या घडामोडी हा आजवर अनेक इतिहासकारांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्वपूर्ण कालखंड होता. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अंमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय  वाटणारी कामगिरी महाराजांनी फत्ते केली. त्यासंदर्भात इतिहासकारांना वाटणारं कुतहूल आणि आकर्षण स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्यामुळेच केवळ मराठीतच नव्हे तर भारतीय भाषांमध्येही शिवाजी महाराजांच्या या कालखंडाचा अभ्यास अनेकांना करावासा वाटतो. अशाच अभ्यासकांपैकी एक आहेत राजस्थानातील घनश्याम माथुर.

 

 

घनश्याम माथुर यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागार तसंच राजस्थान राज्य अभिलेखागारात प्रदीर्घ काळ सेवा केली. माथुर यांनी शिवाजी की आगरा यात्रा’ या पुस्तकात महाराजांच्या आग्रा वास्तव्यात नेमकं काय घडलं याचा वेध अस्सल ऐतिहासिक दस्तावेजांच्या सहाय्याने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य १२ मे ते १८ ऑगस्ट १६६६ या तीन महिने आणि ६ दिवसांच्या काळात आग्रा इथे होते. त्या काळातील घडामोडी आणि घटनाक्रमा संदर्भात माथुर यांनी अतिशय कष्टपूर्वक संशोधन करुन या पुस्तकाचे लिखाण केलं आहे. माथुर यांना मूळ ऐतिहासिक कागदपत्र, पत्रव्यवहार, साधने यांच्यामुळे नवीन माहिती आणि वास्तवाचं आकलन झालं. त्यामुळेच शिवाजी की आगरा यात्रा या पुस्तकाला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

 

 

माथुर यांच्या निष्कर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही औरंगजेबाच्या अटकेत नव्हते. तसंच त्यांची दरबारातही भेट झाली नाही. महाराजांची आणि औरंगजेबाची भेट एका अंतर्गत दालनात झाली आणि त्यावेळेस औरंगजेबाने महाराजांकडे बघण्याचं टाळलं. या संदर्भात माथुर यांचे निरीक्षण असं आहे की औरंगजेबाला त्याच्या सरदारांनी महाराजांच्या अनेकविध चमत्कारांची माहिती पत्राद्वारे कळवली होती. आणि त्यामुळेच औरंगजेबाला भयगंडाने ग्रासलं होतं. महाराज आकाशात झेप घेऊ शकतात तसंच दिवसाला साधारणत३० ते ४० कोस चालू शकतात अशा अनेक कल्पोकल्पित कहाण्या औरंगजेबाला कळल्यामुळे त्याने सुरक्षित ठिकाणीच भेट घेण्याचं ठरवलं.

 

 

औरंगजेबाच्या दालनात झालेली ही पहिली आणि शेवटची भेट ठरली. या सर्व घडामोडींमुळे महाराजांनाही औरंगजेबाने आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य केल्याने संताप अनावर झाला. त्यामुळेच औरंगाजेबाने पाठवलेली भेटवस्तूही महाराजांनी नाकारली. महाराजांनी भेटवस्तू नाकारल्यानंतर औरंगजेब झालेल्या अपमानाचा सूड त्यांची हत्या करुन उगवेल अशी खात्रीच आग्रावासीयांना वाटू लागली.