प्राण्यांवर आधारित सिनेमा करणं हा तर हॉलिवूड सिनेमांचा ट्रेण्डच. हॉलिवूडमध्ये कित्येक फिल्मस या प्राण्यांवर आधारित असतात. त्यामुळे या सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत दिसतात ते प्राणीच... वेगवेगळ्या प्राण्यांना घेऊन हॉलिवूडमध्ये वेगवेगळे फिल्मस केले जातात आणि तिथले प्रेक्षक या सिनेमांना भरभरून दाद देतात. मराठी सिनेमांमध्ये असे फिल्मस पाहायला मिळणं तसं दुर्मिळच मात्र आता सुजय डहाके हा अनोखा प्रयोग मराठी सिनेमामध्ये करतोय कारण सुजय आजोबा नावाचा सिनेमा लवकरच घेऊन येतोय.
या सिनेमाचं नाव आजोबा असलं तरी त्याची कथा वेगळी आहे. या सिनेमाद्वारे एका बिबट्याची कथा सुजय सिल्व्हर स्क्रीनवर घेऊन येतो. हा सामाजिक विषय सिल्व्हर स्क्रीनवर मांडण्यामागे सुजयने बरीच मेहनत घेतली आहे. या सिनेमामध्ये मकरंद अनासपुरे, गिरीश कुलकर्णी, अमृता खानविलकर, ओम बुधकर यांच्या प्रमुख मध्यवर्ती भूमिका आहेत तसंच एक नवा चेहरा या सिनेमात झळकणार असल्याचं बोललं जातंय.
वन्य प्राण्यांसह शूटिंग करण्याची परवानगी भारतात नाहीए त्यामुळे या सिनेमाचं मुख्य शूटिंग परदेशात होणार आहे. यासाठी एका ट्रेन बिबट्याची मदत देखिल घेण्यात येणारे. जनावरांचं संरक्षण करा असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे मात्र सुजयचा हा प्रयोग मराठी सिनेसृष्टीमध्ये कितपत यशस्वी होतो याची उत्सुकता आत्तापासूनच सगळ्यांना लागून राहिली आहे.