झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
‘टीम अण्णां'चे सदस्य प्रशांत भूषण यांच्या मारहाणीला 24 तासही उलटत नाहीत, तोच अण्णा हजारे यांच्या समर्थकांना आज गुरूवारी नवी दिल्लीत पुन्हा मारहाण करण्यात आली. हा हल्ला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचे स्पष्ट झाले.
भूषण यांच्या हल्लेखोरांना पटियाला कोर्टात आणलं असताना, कोर्टाच्या बाहेर अण्णा समर्थकांना मारहाण करण्यात आली. भूषण यांच्यावर हल्ला केलेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनीच पाच अण्णा समर्थकांना जोरदार मारहाण केली. भूषण यांच्या हल्लेखोरांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. यावेळी कोर्टाबाहेर श्रीराम सेना आणि अण्णा समर्थकांमध्ये घोषणायुद्ध रंगलं. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या वादानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना मारहाण केली. जम्मू काश्मरप्रश्नी अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी हल्लेखोरांनी मागणी केली होती.
काल बुधवारी अचानक एका युवकाने टीम अण्णां'चे सदस्य प्रशांत भूषण यांच्या कार्यालयात आसनाजवळ धाव घेतली आणि त्यांची कॉलर पकडून, मारहाण करण्यास सुरवात केली. या हल्ल्यात भूषण यांचे दात त्यांच्याच ओठांमध्ये घुसल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांना दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, भूषण यांच्या मारहाणीला 24 तासही उलटत नाहीत, तोच अण्णा हजारे यांच्या समर्थकांना गुरूवारी नवी दिल्लीत पुन्हा मारहाण करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.
दरम्यान, अशा हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.