www.24taas.com, नवी दिल्ली
युपीएच्या बैठकीला शरद पवार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादी युपीएवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगतीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठताक्रमात पवार यांना डावलून संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांना दुस-या क्रमांकाचं स्थान दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे.
युपीएच्या बैठकीला अनुपस्थित राहून पवारांनी नाराजी दाखवून दिल्याचं बोललं जातय. उपराष्ट्रपतीपदासाठी काल नवी दिल्लीत यूपीएची बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री गैरहजर होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीची नाराजी नसल्याचं राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते डी.पी.त्रिपाठी यांनी म्हटलंय. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शरद पवार या बैठकीला हजर राहणार नसल्याचं त्यांनी आधीच कळवलं होते.
तर कौटुंबिक कारणामुळे प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहू शकले नसल्याचं त्रिपाठी यांनी स्पष्ट केलय. मात्र या खुलाशानं समाधान होऊ शकलेलं नाही. शरद पवारांची अनुपस्थिती ही नाराजीच असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.