आमिरमुळे बाललैंगिक शोषणविरोधी विधेयक मंजूर

Updated: May 23, 2012, 04:13 PM IST

 

www.24taas.com, नवी दिल्ली

 

बालकांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या प्रकारांवर चिंता व्यक्त करत मंगळवारी लोकसभेत बाललैंगिक शोषणविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले असून यापुढे लैंगिकतेसाठी बालकांचा वापर करणार्‍यांना पाच वर्षांची सक्तमजुरी किंवा जन्मठेपेची कठोर शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

 

 

बाल लैंगिक शोषणविरोधातील विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्याने खूप आनंद झाला. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून मी बाल लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला होता. शिवाय सरकारला नव्याने जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात यश मिळाल्याचा आनंद अवर्णनीयच आहे.
- आमिर खान

 

केंद्रीय महिला व बालविकासमंत्री कृष्णा तीरथ यांनी बालकांचे लैंगिक शोषण थांबविण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा करण्याची तरतूद या विधेयकानुसार कायद्यात करण्यात आली असून १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा त्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. विधेयकातील तरतुदीनुसार ज्या बालकाचे लैंगिक शोषण झाले असेल त्याचा ३० दिवसांत जबाब नोंदविण्यात येऊन एका वर्षाच्या आत त्याबाबतचा खटला निकाली काढण्यात येणार आहे.

विधेयकातील तरतुदी

- गुन्हेगारास जन्मठेप
- लैंगिकतेसाठी बालकांचा वापर केल्यास पाच वर्षे सक्तमजुरी
- हाच गुन्हा दुसर्यांचदा केल्यास सात वर्षे सक्तमजुरी
- खटले विशेष न्यायालयात चालणार
- चौकशीसाठी महिला अधिकार्याणची नियुक्ती

 

 

लैंगिक शोषण झालेल्या व्यक्तीच्या मागणीनुसार त्याला हव्या असलेल्या ठिकाणी खटला चालविण्यात यावा, पोलीस अधिकार्‍यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला तर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर हे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनादेखील करण्यात येणार आहे.

 

 

 

सहा महिन्यांच्या बालिकेचे शोषण
बालकांचे लैंगिक शोषण रोखण्याचे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर होत असताना आग्र्यामध्ये एका सहा महिन्यांच्या बालिकेचे शेजारीच राहणार्‍या एका २६ वर्षीय युवकाने टॉफी देण्याचा बहाणा करत तिचे शोषण केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.