काळ्या धनाचे आकडे गायब; श्वेतपत्रिका जाहीर

श्वेतपत्रिकेत सरकार काळ्या पैशाचा आकडा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारनं महत्त्वाच्या मुद्यालाच बगल देत श्वेतपत्रिका जाहीर केलीय.

Updated: May 21, 2012, 02:37 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

श्वेतपत्रिकेत सरकार काळ्या पैशाचा आकडा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारनं महत्त्वाच्या मुद्यालाच बगल देत श्वेतपत्रिका जाहीर केलीय.

 

रिअल इस्टेटमध्ये काळ्या पैशाचा मोठा वापर झाला आहे. तसंच सोन्याच्या खरेदीतही काळा पैसा वापरण्यात आला आहे. सरकारनं काढलेली ही श्वेतपत्रिका पन्नासपेक्षा जास्त पानांची आहे. स्वीस बँकेत भारतातून जमा होणारा पैसा आता कमी झाल्याचंही, या श्वेतपत्रिकेत स्पष्ट करण्यात आलंय. 2006 मध्ये स्वीस बँकेत भारतीयांचे 23,373 कोटी रूपये होते. 2010 मध्ये हा आकडा 9,295 कोटीपर्यंत खाली आलाय.

 

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा रोखण्यासाठी सरकारनं ही श्वेतपत्रिका जारी केलीय. यापुढे आता परदेशातील बँकेत आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या खरेदी व्यवहाराची माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. दरम्यान, लोकसभेतल्या चर्चेत आयपीएलमधल्या काळ्या पैशांचा मुद्दाही चर्चेत आला. केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माखन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.