www.24taas.com, मुंबई
किंगफिशरच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने बुधवारपासून कंपनीचा इंधन पुरवठा बंद केला आहे. आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशरने इंधन पुरवठ्याचे पैसे कंपनीला अदा न केल्याने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. किंगफिशरला त्यामुळे मुंबईतील सहा उड्डाणं रद्द करावी लागली आणि दिल्लीतही त्याचा फटका बसला.
हिंदुस्थान पेट्रोलियम किंगफिशचे सर्वात मोठे इंधन पुरवठादार आहेत आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी इंधन पुरविणं थांबल्याचं कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. किंगफिशर हिंदुस्थान पेट्रोलियमला ४२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबीदार आहे आणि रोजची देणी ती भागू न शकल्याने अखेर इंधन पुरवठा खंडित करण्यात आला.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन फारच कमी इंधनाचा पुरवठा किंगफिशरला करतं तर भारत पेट्रोलियम काही विमानतळांवर रोखीने इंधन कंपनीला विकतं. किंगफिशरने हिंदुस्थान पेट्रोलियमला ४२५ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी बँक गँरंटी दिली होती पण अद्याप ती एनकॅश केलेली नाही. किंगफिशर दररोज हिंदुस्थान पेट्रोलियमकडून चार ते साडेचार कोटी रुपयांचे जेट फ्युल विकत घेते. मागच्या वर्षापासून किंगरफिशनला रोज रक्कम अदा करण्यास सांगण्यात आलं होतं.
आता हे कमी कि काय आयएटीए क्लिअरिंग हाऊसनेही एअरलाईनला पैसे थकवल्या प्रकरणी निलंबित केलं आहे. गेल्या महिन्यात दोन वेळा किंगफिशरवर ही पाळी ओढावली आहे. आयएटीएच्या मार्फत कंपन्या व्यवहारांची पूर्तता करतात. आयकर खात्याने किंगफिशर कंपनीची १९ खाती गोठावली आहेत आणि २३ कोटी रुपयांची वसुली केली आहे. किंगफिशरला डिसेंबर २०११ अखेरीस ४४४ कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीला २०१०-११ आर्थिक वर्षात १०२७ कोटी कोटी रुपयांचा तोटा झाला तर संचित तोटा ४००० कोटी रुपयांच्या वर गेला आहे. कंपनीवर तब्बल ७००० कोटी रुपये कर्जाचा डोंगर चढला आहे.