टीम अण्णांमध्ये फूट पडलीय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून टीम अण्णांमध्ये असलेले मतभेद प्रकर्षानं समोर येतायत. पण आता टीम अण्णा बऱखास्त करावी आणि त्याची फेररचना व्हावी, अशी मागणी मेधा पाटकर यांच्यासह कुमार विश्वास यांनीही केलीय. त्याचबरोबर उद्या गाझियाबादमध्ये होणा-या टीम अण्णांच्या कोअर कमिटी बैठकीलाही अण्णांसह, पाटकर आणि संतोष हेगडे उपस्थित राहणार नाहीत.
जनलोकपालसाठी सरकारला जेरीस आणल्यानंतर टीम अण्णांमध्ये फुट पडण्याची चिन्हे आहेत. शनिवारी गाझियाबादमध्ये टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठक होत असताना कमिटीची फेररचना करण्याची मागणी सदस्यांकडून सुरु झाली.
कोअर कमिटीच्या ज्येष्ठ सदस्य मेधा पाटकर यांनी समितीची फेररचना करावी असा सूर लावला. मात्र टीम अण्णांमध्ये मतभेद नसल्याचं स्पष्ट केलय. टीम अण्णांच्या सदस्यांवर होणा-या आरोपांमुळं आंदोलनाची दिशा बदलतेय. त्यामुळं समितीत विस्तार करा किंवा बरखास्त करा अशी मागणी त्यांनी केलीय तर टीम अण्णांचे सदस्य कुमार विश्वास यांनीही अण्णांना पत्र पाठवून टीम अण्णा बरखास्त करण्याची मागणी केलीय.
शांती भूषण यांचं सीडी प्रकरण, प्रशांत भूषण यांच्या काश्मीरबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेली मारहाण, केजरीवालांसह टीम अण्णा सदस्यांवर झालेले हल्ले आणि किरण बेंदींच्या विमानाच्या तिकिटाची हेराफेरी यामुळे टीम अण्णांच्या सदस्यांबद्दलही संशय निर्माण झालाय. अशातच गाझियाबादमध्ये होणा-या कोअर कमिटीच्या बैठकीला अण्णांसह, संतोष हेगडे आणि मेधा पाटकरही उपस्थित राहणार नाहीत.
या सगळ्यामुळे टीम अण्णांमधले वाद प्रकर्षानं चव्हाट्यावर आलेत. आणि या सगळ्या गदारोळात जनलोकपालची पुढची वाटचाल काय असणार, हा प्रश्न बाजूलाच पडलाय.