अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात आघाडी उघडणा-या काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आता आध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
श्री. श्री. रविशंकर यांना आपल्या जाळ्यात ओढून भाजप आणि संघ सरकारला नव्यानं घेरण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दिग्गीराजांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटनं या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी संघ आणि भाजपच्या तीन योजनांचा उल्लेख केला होता. बाबा रामदेव आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर आता श्री. श्री. रविशंकर यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं दिग्गीराजांनी म्हटले आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेल्या संघ परिवाराचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर या आरोपांबाबत काहीही बोलण्यास श्री. श्री. रविशंकर यांनी नकार दिलाय. मात्र आपण कुणालाही घाबरत नसून, भ्रष्टाचाराविरोधात बोलत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.