www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्र सरकारनं आज वर्ष २०१२-१३साठी नव्या व्यापार नीतीची घोषणा केलीय. भारताची निर्यात २० टक्के वाढवून ती ३६० अरब डॉलरपर्यंत पोहचवण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी म्हटलंय.
सध्याच्या कठिण काळात हे लक्ष्य गाठण्यासाठी, जास्त रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या क्षेत्रातल्या निर्यातदारांना २ टक्के कर्ज सहाय्यता देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. २००९ नंतरच्या अनेक अडचणींना तोंड देऊनही आम्ही स्थैर्य टिकवून आहोत. सरकारच्या सात सुत्रीय रणनीतीमुळं हे शक्य झाल्याचं आनंद शर्मा यांनी म्हटलंय. या रणनीतीमध्ये निर्यातीच्या माध्यमातून श्रम उद्योगांना चालना देणं, घरगुती उद्योगांना प्रोत्साहन देणं, वैश्विक संकटांना तोंड देण्यासाठी नव्या बाजारांमध्ये स्थान मिळवणं, पूर्वेत्तर क्षेत्रांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देणं अशा विविध गोष्टींवर विशेष लक्ष दिल्याचंही शर्मा यांनी म्हटलंय.
निर्यात संवर्धनासाठी परंपरागत वस्तुंवर शुन्य टक्के शुल्काच्या ईपीसीजी योजनेच्या विस्ताराची घोषणेचं व्यापाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. आता ही योजना पुढच्या ३१ मार्चपर्यंत कार्यान्वित राहील.