www.24taas.com, नवी दिल्ली
कापूस आणि साखर निर्यात धोरणाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पंतप्रधानांनी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला कृषी मंत्री शरद पवार, व्यापार आणि वाणिज्यमंत्री कमलनाथ, परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णा यांच्यासह अन्य ज्येष्ठ मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केंद्राच्या निर्यात धोरणाच्या धरसोड वृत्तीबाबत नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत राज्यपालांना टार्गेट केले होते. त्यामुळे हा प्रश्न पवार बैठकीत उपस्थित करतात का, याकडे लक्ष आहे.
तसंच धरसोड वृत्तीमुळं जागतीक बाजारपेठेत भारताची विश्वासार्हता कमी होत चालल्याचंही पवारांनी आपल्या पत्रात नमूद केलं होत. तसंच राज्यांकडून निर्यात धोरणाबाबत योग्य भूमिका घेण्याचीही मागणी या पत्रातून पवारांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.