झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
राजस्थानमध्ये बेपत्ता झालेल्या भँवरी देवी या परिचारिकेचे महिपाल मदेरना यांच्या व्यतिरिक्त तीन मंत्री आणि तीन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशीही संबंध असल्याचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले आहेत. भँवरी देवी बेपत्ता झाल्या प्रकरणी महिपाल मदेरना यांची राजस्थान सरकारमधून हकालपट्टी करण्यात आली. भँवरी देवीचा मासिक पगार फक्त आठ हजार रुपये असताना तिने प्रचंड माया गोळा केल्याचंही सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं आहे. सीबीआय आता भँवरी देवीच्या उत्पन्नाच्या स्त्रोताचा शोध घेत आहे.
भँवरी देवी जोधपुरच्या बिलारा भागातून १ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. भँवरी देवी बेपत्ता होण्यात मदेरना यांचा हात असल्याच्या कारणावरुन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांची सरकारमधून हकालपट्टी केली होती. भँवरी देवी आणि मदेरना याची एकत्र असलेल्या वादग्रस्त सीडीवरुन भँवरी देवी मदेरना यांना ब्लॅकमेल करत होती. भँवरी देवीचे केवळ मदेरना यांच्याशीच संबंध नव्हते तर तीन मंत्री आणि तीन आयएएस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे धागेदोरे सीबीआयला सापडल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. भँवरी देवी केवळ मदेरना नव्हे तर इतर काही लोकांनाही ब्लॅकमेल करत असावी असा संशयही या अधिकाऱ्याने व्यक्त केला. भँवरी देवीने एका ऑडियो क्लिपमध्ये अजमेर इथल्या एका बँक लॉकरमध्ये सीडी लपवून ठेवल्याचं उल्लेख केला आहे.