झी २४ तास वेब टीम, अमेठी
काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांचा ताफा आज सकाळी अमेठीत प्रवेश करताना अडविला.
राहुल गांधी यांचा ताफा अडवून आंदोलनकर्त्यांनी स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याच्या घोषणा दिल्या. एक दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांचे असे स्वागत होईल, हे कोणालाच अपेक्षित नव्हते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धांदल उडाली. केंद्र सरकारच्या विविध योजनांची कशाप्रकारे अंमलबजावणी करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर आले आहेत.
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचं आणखी एकदा दिसून आलं. कारण, त्यांच्या अमेठीतल्या सभेवेळी एका पिस्तुलधारी युवकाला अटक करण्यात आली. प्रदीप सोनी असं या युवकाचं नाव आहे. त्याच्याजवळील पिस्तुल पोलिसांनी जप्त केलं आहे. प्रदीप राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता. या घटनेमुळे राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.