www.24taas.com, लखनौ
उत्तर प्रदेश विधिमंडळात आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ, धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करत अखिलेश यादव सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर घेरले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान बसपाचे आमदार इतके आक्रमक झाले की त्यांच्या घोषणाबाजीत राज्यपालांचं भाषण ऐकूही येत नव्हतं.
निळ्या टोप्या आणि हातात फलक घेऊन आलेले आमदार राज्यपालांसमोर आले आणि खुर्च्यांवर चढून कागद फाडू लागले. राज्यपालांसमोर सुरक्षा रक्षकांनी कडं केलं होतं आणि या गदारोळातच त्यांचं भाषण सुरु होतं. काही आमदारांनी तर राज्यपालांवर थेट कागदच भिरकावले आणि सुरक्षा रक्षकांनी ते झेलल्यानं राज्यपालांपर्यंत पोचले नाहीत. सभागृहात गदारोळ, धक्काबुक्कीही झाली. घोषणा इतक्या तारस्वरात होत्या की सभागृहात काय चाललंय हे ऐकायलाही येत नव्हतं.
अखेर सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. समाजवादी पार्टीची सत्ता राज्यात आल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था पुरती बिघडल्याचा बसपाचा आरोप आहे. त्यातही बसपाच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही बसपानं केला आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु झालेल्या अधिवेशनात सुरुवातीलाच त्याचे पडसाद उमटले. उत्तर प्रदेश विधिमंडळात गदारोळ आणि हंगामा नवीन नसला तरी आज राज्यपालांच्या भाषणादरम्यान ज्या पद्धतीनं गोंधळ झाला ते पाहता बसपानं आक्रमक होऊन अखिलेश सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.