झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद
भ्रष्टाचारामुळं सतत चर्चेत असलेल्या औरंगाबाद महापालिकेत एक वेगळा प्रयोग करण्यात आला. आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ अधिकारी आणि पदाधिका-यांना देण्यात आली. मात्र, अनेक कर्मचा-यांनी याकडे पाठ फिरवल्याचंचं दिसून आलं.
महापालिकेच्या सर्वासाधारण सभेत नगरसेवकांचा गोंधळ, भरसभेत नगरसेविकेनं मांडलेला भिशीचा डाव, 8 दिवसांनी एकातरी अधिका-याचं होणारं निलंबन आणि गहाळ फाईलींचा गोंधळ यामुळं औरंगाबाद महापालिका पुरती बदनाम झाली आहे. पण पालिकेत दक्षता जागृती सप्ताहाच्या निमित्तानं भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेत महापालिकेत जादूचा प्रयोग करण्यात आला.
दोन दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद महापालिकेचे वाभाडे काढले. तर ही शपथ घेण्यासाठी पालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिका-यांनी अनुपस्थीती लावून देखील हा प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास महापौरांना वाटतो.
गेल्या वर्षी महापालिकेत असाच शपथविधी पार पडला होता. मात्र, त्यानंतर वर्षभर भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर आली. यंदा तरी त्याचीच पुनरारुत्ती होऊ नये, अशीच अपेक्षा सर्वसामान्य औरंगाबादकर करत आहेत.