राज्यात अवकाळी पावसाचे २० बळी

अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भाला चांगलेचे झोडपून काढले. वादळवार्‍यासह आलेल्या पावसाने बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे आणि बुलडाणा जिल्ह्यात २0 जणांचे बळी घेतले आहेत. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसाने गुरुवारी खान्देशातही थैमान घातले.

Updated: May 11, 2012, 11:14 AM IST

www.24taas.com, जळगाव/औरंगाबाद

 

 

अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भाला चांगलेचे झोडपून काढले. वादळवार्‍यासह आलेल्या पावसाने बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे  आणि बुलडाणा जिल्ह्यात २0 जणांचे बळी घेतले आहेत. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसाने गुरुवारी खान्देशातही थैमान घातले.

 

 

अचानक झालेल्या या पावसामुळे शेत-शिवारांतील पिके आडवी झाली असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. जळगाव जिल्हय़ात अमळनेर येथे वीटभट्टीवरील मजुराचा वीज कोसळून मृत्यू झाला. पातोंडाजवळ सोसाट्याच्या वार्‍यामुळे दुचाकी भरकटून विजेच्या खांबावर आदळली. यात चाळीसगाव येथील दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. चोपडा तालुक्यात नागलवाडी येथे शेतकरी, सालदाराचा मृत्यू झाला. बीडमध्ये तीन, जालना, परभणी, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक आणि हिंगोलीत दोन जणांचे बळी गेले आहेत.  नंदूरबारच्या शिरपूर तालुक्यात सांगवी येथे हॉटेलची भींत कोसळून त्याखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. खंबाळे येथे घरावर वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुलडाण्यासह विदर्भात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 

 

खामगाव, निमकवळा, बोथाकाजी, अटाळी, जलंब या भागात पाऊस पडला. निमकवळा येथे वादळी वार्‍यासह १५ मिनिटे गारा पडल्याने शेतकर्‍यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. खान्देशात वीज पडून सात जण ठार झाले तर जोरदार वादळाने भुसावळ विभागातील यावल व रावेर तालुक्यात केळी, पपई, मका यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. हिंगोली जिल्हय़ात सेनगाव तालुक्यातील भोसी येथे लिंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या विकास भाऊराव पोले ,  त्यांचा पाच वर्षांचा मुलगा तेजसयांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. परभणीच्या पाथरी तालुक्यात नाथरा येथे मंगला भास्कर काळे , यांचा शेतात काम करताना वीज कोसळून मृत्यू झाला. जालना जिल्हय़ातील परतूर तालुक्यातील खांडवी येथे वीज पडल्याने डिगंबर बबन बरकुले यांचा मृत्यू झाला.  विठ्ठल साळवे हे जखमी झाले.

 

 

वादळाने कैर्‍यांचेही नुकसान झाले आहे. सलग चौथ्या दिवशीही मराठवाड्याच्या काही भागाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रावेर तालुक्यात उटखेडा येथे वादळामुळे पडलेल्या झाडाखाली दबून महिलेचा मृत्यू झाला.शेतात काम करणार्‍यावर वीज कोसळली, झाडावर वीज कोसळली, घराची भिंत पडली तसेच घरावरचे छत कोसळून हे बळी गेले आहेत. दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह अनेक भागांत गाराही पडल्या. सोलापुरात विजेच्या तारा कोसळून सहा शेळ्या दगावल्या.