गुहागरमध्ये सात कुटुंब वाळीत

गुहागर तालुक्यातील तांबडवाडी इथं राहणारी सात कुटुंबं आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून गाव पुढा-यांनी त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Updated: May 17, 2012, 01:56 PM IST

www.24taas.com, गुहागर

 

गुहागर तालुक्यातील तांबडवाडी इथं राहणारी सात कुटुंबं आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून गाव पुढा-यांनी त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातल्या इतर मुलांबरोबर खेळणं-बागडणं सोडून या मुलांना असं बसून राहावं  लागतंय. कारण त्यांच्या कुटुंबियांना गावानं वाळीत टाकलंय. पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुहागर तालुक्यातील तवसालनजीकच्या तांबडवाडीतील सात कुटुंबांना गावानं वाळीत टाकलंय. या वाळीत टाकलेल्या कुटुंबियांबरोबर गावातल्या इतर कुणी बोललं तरी बोलणा-यांवरही बहिष्कार टाकला जातो.

 

काळ बदलला तसा बहिष्कार टाकण्याची कारणेही बदलली. जातीच्या गाठी सैल झाल्यानंतर आता आर्थिक गाठी मात्र घट्ट होतायत. त्यातूनच गावातल्या पुढा-यांनी आपल्या फायद्यासाठी गाववाल्यांवर काही नियम लादलेत. कार्यक्रमाची तिकीटे विकणे, पुजेचे साहित्य मुंबईतल्या ठराविक मंडळाकडूनच खरेदी करणं, एक हजार रुपये किमतीचा गणपती असल्यास घरातल्या प्रत्येक पुरुषानं ५०० रुपयांचे सामान खरेदी करणं.  हे नियम धुडकावल्यानेच मुजोर पुढा-यांनी वाघे, निवाते आणि पारडले अशा सात कुटुंबियांवर बहिष्काराचे अस्त्र उपसलंय.

 

सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे. याबाबत गुहागर पोलिसांत तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.  मुंबईमध्ये राहून गावावर कायदे लादणा-या स्वयंघोषित पुढा-यांना जाब विचारण्याची हिम्मत पोलीस खातेही दाखवत नसल्यानं हीच का लोकशाही असा प्रश्न पडू लागला आहे.

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="102765"]