ठाण्याच्या वाहतुकीचा मार्ग बदलला

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता ठाण्यातील नौपाडा वाहतूक शाखेच्या वतीनं रोटरी पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र ठाणेकरांनी या पर्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Updated: May 26, 2012, 12:09 PM IST

www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता ठाण्यातील नौपाडा वाहतूक शाखेच्या वतीनं रोटरी पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुढील ७ दिवस तीन पेट्रोल पंप ते वंदना सिनेमागृह आणि गजानन महाराज चौक हा वाहतूकीचा मार्ग असणार आहे. मात्र ठाणेकरांनी या पर्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
 
ठाणे शहरातला वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. या समस्येवर उपाय म्हणून वाहतूक शाखेनं तीन हात नाक्याकडून तीन पेट्रोल पम्प मार्गे गजानन महाराज चौकाकडे जाणा-या सर्व वाहनांना बंदी घातलीय. इथल्या नागरिकांना वळसा घालून इच्छितस्थळी जावं लागत असल्यानं त्यांनी वाहतूक विभागाच्या एकतर्फी निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय.
 
तर रोटरी पद्धतीनं करण्यात आलेल्या मार्गांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि इंधनात बचत होईल असं वाहतूक विभागाचे अधिकारी सांगत आहेत. मात्र वाहतूक विभागाच्या या तोडग्यावर नागरिक नाराज आहेत. वाहतूकीच्या नियमांमुळे शहारतल्या इतर चौकांमध्येही भविष्यात वाहतूक कोंडी होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होतेय.