स्वाती नाईक, www.24taas.com, नवी मुंबई
अचानक पडलेल्या थंडीचा आंब्याला फटका बसला आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली आहे. यामुळेच साऱ्यांचा आवडीच्या आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे.
फळांचा राजा आंबा फेब्रुवारी महिन्यात वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला. आंबा खरेदी करावा असं वाटलं तरी त्यासाठी खिशाला अधिक कात्री बसणार आहे. मार्चमध्ये रोज आठ ते दहा हजार आंब्याच्या पेट्या येतात. यंदा अचानक वाढलेल्या थंडीने मार्च-एप्रिल महिन्यात येणारे आंबा पीक कमी झालं आहे. त्यामुळे आवक घटल्याने केवळ अडीच हजार पेट्या रोज मार्केटमध्ये येत आहेत. त्याचा परिणाम आंब्याच्या दरावर झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात आंब्याचे दर तीनशे ते सातशे रुपये प्रतिडझन होते. आवक कमी झाल्याने आंब्याचा दर आता प्रतिडझन पाचशे ते हजार रुपये इतका झाला आहे. सध्या तरी आवक कमी झाल्याने आंब्याच्या किंमती वाढल्या आहेत. आता एप्रिलमध्ये आवक वाढल्यानंतरच आंब्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.