www.24taas.com, ठाणे
ठाण्यामध्ये पदवीधर मतदार संघातल्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीए. त्यामुळे युती आणि आघाडीतल्या वादात कुणाचा विजय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकांनंतर चार जिल्ह्यातल्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची चुरस सुरू झालीए. ठाण्यात ही निवडणूकीची लढाई भाजपचे संजय केळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांच्यात होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीए. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास संजय केळकरांनी व्यक्त केला आहे.
तसंच खासदारकीच्या निवडणुकीत युतीच्या ताकदीनं वसंत डावखरेंना दोनदा पाडलंय. त्यामुळे त्यांच्या ताकदीची भीती वाटत नसल्याचंही केळकरांनी म्हटलंय. तर केळकरांचे आरोप बिनबुडाचे असून आपला आघाडीवर विश्वास असल्याचं निरंजन डावखरेंनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचडांनी यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद नसून नीलेश चव्हाणांची नाराजी लवकरच दूर करू असं म्हटलंय. तर मतभेद विसरून निरंजनला पाठिंबा देऊ असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. दरम्यान, युती आणि आघाडीतल्या वादात शेवटी कुणाचा विजय होतो ते लवकरच कळेल.