नालासोपाऱ्यातल्या आझादनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या खैतुलनिसा अन्सारींची आपल्या पोटच्या गोळ्याशी तब्बल एक वर्षानंतर भेट होणार आहे. गेल्या वर्षी १८ जानेवारी २०१० ला खैतुलनिसाचा दोन महिन्यांचा मुलगा इदुल्ला याचं शर्ली नावाच्या महिलेनं अपहरण केलं. या प्रकरणी पोलिसांनी शर्ली आणि तिच्या तीन साथीदारांना अटक केली. मात्र अपहरण केलेल्या मुलाचा शोध घेतला नाही.
पोलीस दाद देत नसल्यानं अखेर खैतुलनिसा हिनं मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानं या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षकांकडं सोपवला. पोलीस उपअधीक्षक राजेश्वरी रेडकर यांनी नव्यान तपास करुन हरवलेल्या इदुल्लाला शोधून काढलं. शर्ली हिनं इदुल्लाला गिरीश खुमान यांना दिल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी इदुल्लाला सध्या बालसंगोपन केंद्रात ठेवलं असून लवकरच त्याच्या आईवडिलांशी त्याची भेट होणार आहे. हरवलेल्या मुलाला परत मिळवण्यासाठी एका मातेनं पोलीस प्रशासनाशी दिलेला लढा कौतुकास्पद म्हणावा लागेल.