www.24taas.com, नवी मुंबई
ड्रेनेज लाईन, जलवाहिनी, महानगर गॅस पाईपलाईन, गटारं यासाठी नवी मुंबईतले रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदून ठेवण्यात आलेत. काँक्रिटीकरणासाठी मुख्य रस्तेदेखील खोदल्यामुळं नवी मुंबईकरांना रस्त्यातून प्रवास करणं कठीण झालं आहे.
नवी मुंबईत जलवाहिनीसाठी, ११६ किलोमीटरची मलनिस्सारण पाईपलाईन टाकण्याचं, गटारं बनवण्याचं तसंच रस्ता काँक्रिटीकरणाचं काम गेल्या दोन वर्षांपास्नं सुरू आहे. सध्या ऐरोली आणि कोपरखैरणे भागातले अंतर्गत आणि मुख्य रस्तेही खोदून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यातले खड्डे आणि ट्रॅफिक जॅम वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
कुठलंही नियोजन न करता अशी रस्त्यांची कामं केलं जात असल्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक दोघंही प्रशासनावर नाराज आहे. खोदलेले रस्ते युद्धपातळीवर काम करुन पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं स्थायी समिती सभापतींनी सांगितलं आहे.
एकतर सातत्यानं रस्त्यांचं खोदकाम होतंय, दुसरीकडं खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी अनेक आठवडे वाट पाहावी लागत आहे. त्यामुळं या सततच्या त्रासानं नवी मुंबईकरांच्या संतापाचा आता उद्रेक होण्याची शक्यता आहे.