www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीत ग्रंथालयाच्या श्रेयावरून शिवसेना-मनसेत जुंपली आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज दुपारी ४ वाजता उदघाटनाचा कार्यक्रम असताना मनसे आमदार रमेश पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह या ग्रंथालयाचं बळजबरीनं उदघाटन उरकलं आहे. या ग्रंथालयासाठी मनसेनं पाठपुरावा केल्याचं मनसेचं म्हणण आहे.
त्यासाठीचं मनसेनं हे उद्घाटन उरकलं आहे. डोंबिवलीत गीता हरकिसनदास हॉस्पिटलचंही उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. आता या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना काय पावलं उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मनसे आमदार रमेश पाटील आणि शहराध्यक्षांसह मनसेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं. ग्रंथालय आणि गीता हरकिसनदास हॉस्पिटलचं संध्याकाळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.