www.24taas.com, मुंबई
पाच महापालिकांचा निकाल जवळपास निश्चित झाला असून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसने पाच पैकी चार महापालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याची कामगिरी केली आहे.
काँग्रेसने मालेगाव – २५, भिवंडी- २६, लातूर -४९ आणि चंद्रपुरात २६ जागा पटाकवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष निवडून आला आहे.
चंद्रपुरात २६ जागा
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला सर्वात जास्त २६ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला फक्त १८ जागांवर विजय मिळवता आला आहे. चंद्रपूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभाग क्रमांक २५ बाजार वार्ड मधून भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळवता आली असून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक जैस्वाल यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे करिम लाला काझी यांनी जेस्वाल यांचा पराभव केला आहे. तर शिवसेनेला सहा ठिकाणी यश आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.
लातूरमध्ये देशमुखी
लातूरमध्ये पहिल्यांदा झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत कॉंग्रेसने ७० पैकी ४९ जागा जिंकल्या. महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत यशामागे विलासरावांच्या घरात यंदा आलेल्या दोन सुनांचा पायगुण लाभल्याचे बोलले जाते.
लातूरमध्ये राष्ट्रवादीला १३ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेने ६ तर आरपीआय (आठवले गट) २ जागा जिंकल्या. भाजप आणि मनसेला एकही जागा जिंकता आल्या नाही.
मालेगावात मनसेने खाते उघडले
मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्येही पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील पाच पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा करीश्मा दिसून आला आहे. मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, मालेगाव आणि चंद्रपूर येथे खातं उघडून आपण पालिकेत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्यात आता ग्रामीण भागात मनसेने आपले जाळे पसरविण्यात यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक, पुणे या प्रमुख पालिकेत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, खेड आणि वणी या पालिकेत मनसेची सत्ता आहे. तर काही ठिकाणी जिल्हा परिषदेतही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसेनेने आपली ताकत दाखवून दिली आहे. तर केडीएमसी आणि पुण्यात विरोधांची भूमिका बजावली आहे. आता पाच पालिका निवडणुकीत मनसेला यश मिळत असल्याने पक्षाची ताकत वाढण्यास मदत झाली आहे.