www.24taas.com, चंद्रपूर
चंद्रपूर महापालिका गठीत होऊनही शहरातील ५० हजार लोकवस्तीला भेडसावणाऱ्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न लोंबकळतोच आहे. आता महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलंय.
चंद्रपूरातील एक महत्वाचा परिसर म्हणजे बाबूपेठ. मुख्यत्वे श्रमिक वस्ती असलेल्या या भागाचा म्हणावा तसा व्यावसायिक विकास झालेला नाही. त्यामुळे लहानसहान गरजांसाठी इथल्या नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागते. पण शहरी भाग आणि बाबूपेठ भागाला जोडणा-या दोन्ही मार्गावर रेल्वेमार्ग असल्यानं त्यावरील फाटक २४ तासातून १६ तास बंदच असते त्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत. तर निवडणूका आल्या की उड्डाण पुलाची निर्मिती करण्याची फक्त आश्वासनं नागरिकांना दिली जातात.
या मुद्द्यावरून जवळपास सर्व राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी आंदोलनं केली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नी नियोजनशून्य काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. तर या विषयावर गंभीर असल्याची भूमिका सत्ताधारी भाजपनं केलाय.
गेल्या १० वर्षात राज्य शासनानं अनेक योजनांसाठी चंद्रपूर नगरपरिषदेला मोठा निधी देऊ केला. मात्र या निधीचे अपेक्षीत परिणाम दिसत नव्हते. सतत आर्थिक परिस्थिती वाईट असल्याचं कारण पुढे करत विकास कामांना फाटा देण्यात आलाय. त्याचच उदाहरण म्हणजे हा बाबूपेठ उड्डाणपूल. आतातरी इथल्या नागरिकांचे हाल संपतील का, कि पुन्हा श्रेयाच्या वादात हा पूल राजकारणाचा बळी ठरेल याचं उत्तर कुणाकडेच नाही नागरिकांचे हाल मात्र अव्याहतपणे सुरूच आहेत.