नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोघांची हत्या

गडचिरोली जिल्हय़ात राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे हत्यासत्र राबवणाऱ्या नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील मरकेगावात आणखी दोघांची हत्या केली. ते एव्हढ्यावर न थांबता दहा जणांचे अपहरण केले. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांच्या अपहरणाचा पोलिसांनी दावा फेटाळला आहे.

Updated: Apr 27, 2012, 01:05 PM IST

www.24taas.com, गडचिरोली

गडचिरोली जिल्हय़ात राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे हत्यासत्र राबवणाऱ्या नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील मरकेगावात आणखी दोघांची हत्या केली. ते एव्हढ्यावर न थांबता दहा जणांचे अपहरण केले. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, नागरिकांच्या अपहरणाचा पोलिसांनी दावा फेटाळला आहे.

छत्तीसगडच्या सीमेपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचशे लोकवस्तीच्या मरकेगावात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शंभर नक्षलवादी आले. त्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना गोळा केले. त्यानंतर रामू नरोटे व देवसाय उसेंडी या दोन आदिवासींना गावाच्या बाहेर आणून लाठय़ा काठय़ांनी बेदम मारहाण केली. यात दोघांचा मृत्यू झाला.

 हे दोन्ही मृतदेह दुपारी चारच्या सुमारास धानोराच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. नक्षलवाद्यांनी ज्या दोघांची हत्या केली ते त्यांच्या चळवळीचे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. पोलिसांनी या दोघांवर याआधी नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून गुन्हे सुध्दा दाखल केले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी या गावातील बहुतांश नागरिकांवर नक्षलवाद्यांचे समर्थक म्हणून खटले दाखल केले होते. त्यात बुधवारी ठार करण्यात आलेल्या या दोघांचासुद्धा समावेश होता.

नक्षलवाद्यांनी काल मरकेगावात नागरिकांना गोळा करून एक बैठक घेतली. त्यात या दोघांना ठार करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्याला गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर नक्षलवाद्यांनी दहा गावकऱ्यांचे अपहरण केले. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे या अपहरणाविषयी कुणीही बोलायला तयार नाही. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.