देवा तुला ठेऊ कुठं!!!

दिवे आगर, अंबेजोगाईमधील मंदिरातील चोरीच्या घटनेवरून आता देवही सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांचा नाशिकमधील विविध देवस्थान ट्रस्टसह पोलिसांनीही धसका घेतला आहे.

Updated: Apr 27, 2012, 06:50 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

दिवे आगर, अंबेजोगाईमधील मंदिरातील चोरीच्या घटनेवरून आता देवही सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनांचा नाशिकमधील विविध देवस्थान ट्रस्टसह पोलिसांनीही धसका घेतला असून बंदोबस्त वाढविण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरा, अलार्म सिस्टीम बसविणे, दागिन्यांसह मूर्तीचा विमा काढणे अशी पावलं उचलली जात आहेत.

 

मंदिराची नगरी म्हणून नाशिकची ओळख .मात्र मंदिरातील देव आणि त्यांचे विविध अलंकार सुरक्षित आहेत का? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. पण याचं उत्तर नाही असंच आहे. डीजीपी नगर परिसरातील विघ्नहरण गणेश मंदिर. ह्या मंदिरात काही महिन्यापूर्वी चांदीच्या गणेश मूर्तीची चोरी झाली होती. त्यामुळे चोरांपासून देवाचं संरक्षण व्हावं म्हणून देवालाच गाभाऱ्यात बंदिस्त करण्यात आलं आहे. दरवाजाला अलार्म सिस्टीम बसविण्यात आली आहे.

 

तसंच नाशिकचं ग्राम दैवत असणाऱ्या कालिकामाता मंदिरासह भद्रकाली परिसरातील साक्षीगणेश आणि रविवार कारंजा परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दिवे आगर, अंबेजोगाईच्या घटनेनंतर मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं पोलीस सांगत आहेत. दिवे आगर, अंबेजोगईमधील घटनेवरून देवंच असुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे कायद्याचं राज्य म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.