www.24taas.com, नाशिक
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत अहमदनगरमधील दोन प्रबळ उमेदवारांमध्ये झालेल्या मत विभागणीचा लाभ घेत नाशिकच्या अपक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी विजय मिळविला. डॉ. हिरे यांनी आघाडीला दे धक्का दिला.
पहिल्या पसंतीच्या फेरीत डॉ. हिरे यांना १६,८६३ मते मिळाली. तर राजेंद्र लांडे पाटील यांना १०,०३१ आणि डॉ. निंबा नांद्रे यांना ७,०४७ मते मिळाली. या फेरीत एकूण ४४,५०० मतांची मोजणी करण्यात आली. त्यातील ४२,५५८ मते वैध ठरली तर उर्वरित १,९४२ मते अवैध ठरली. पहिल्या पसंतीच्या क्रमात एकही उमेदवार २१,२८० मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. रात्री ९.३० नंतर निकाल घोषीत करण्यात आला.
डॉ. हिरे यांना ८,४२८ मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले. हिरे यांना २०,९०२ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र लांडे यांना १२,४७४ मते पडलीत. शिक्षक लोकशाही आघाडीतील फूट, प्रादेशिक वाद, अर्थपूर्ण व्यवहार या कारणांमुळे निवडणूक कमालीची चुरशीची ठरली होती. एकूण १६ उमेदवारांपैकी नाशिक व अहमदनगरमधील उमेदवारांची आणि मतदारांची संख्या सर्वाधिक होती.
नगर जिल्ह्य़ातील उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा नाशिकच्या डॉ. हिरेंना मिळाल्याचे पहिल्या फेरीत पाहावयास मिळाले. शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)तर्फे आपलीच उमेदवारी अधिकृत असल्याचा दावा लांडे पाटील व डॉ. नांद्रे या दोघांनी केला होता. डॉ हिरे यांना नाशिक जिल्हा टीडीएफ एकीकरण समितीने पुरस्कृत केले होते. विशेष म्हणजे हिरे वगळता इतर सर्व उमेदवार हे शिक्षक होते. हिरे हे महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेशी संबंधित आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीतही हिरे यांनी विजय मिळविला आहे.
मालेगाव तालुक्यातील दाभाडी विधानसभा मतदारसंघ २००४ मध्ये शिवसेनेच्या ताब्यात गेल्यानंतर हिरे घराण्याकडील एकेक सत्तास्थाने खालसा झाली. माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी तर जणू राजकारणातून संन्यास घेतल्यासारखे दिसत होते. असे असताना अपूर्व हिरे यांनी नाशिकमध्ये नगरसेवक म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून येत चांगलेच बस्तान बसविले. त्यात आता शिक्षक मतदारसंघातील विजयाची भर पडली आहे