www.24taas.com, नाशिक
नाशिककरांचा रिक्षाप्रवास आता आणखी महागलाय. नाशिकमध्ये रिक्षाभाड्यात तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिककरांना पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे किमान भाड्यापोटी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.
महागाईच्या आगीत होरपळणा-या नाशिककरांना आता रिक्षाभाडेवाढीचे चटके सोसावे लागणार आहेत. रिक्षाचालक मालक संघटनांकडून सतत होणा-या मागणीला प्रादेशिक परिवहन विभागानं ग्रीन सिग्नल दाखवत प्रवासी भाड्यात पंचवीस टक्क्यांनी वाढ केलीय. त्यामुळं आता नाशिककरांना किमान भाडं पंधरा रुपये मोजावं लागणार आहे.
याआधी पहिल्या 1.6 किलोमीटरसाठी नाशिककरांना 13 रुपये द्यावे लागत होते. मात्र नव्या भाडेवाढीनुसार आता 15 रुपये आकारण्यात येतील. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक टप्प्यासाठी आधी 8 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता साडेनऊ रुपये भुर्दंड सोसावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रात 27 मार्गावर शेअर रिक्षा योजना राबवण्यात येणार असून 25 टक्के भाडेवाढ या मार्गावर करण्यात आलीय. रोजचा प्रवास महागल्यानं नाशिककरांनी संताप व्यक्त केलाय. ही दरवाढ मागं घेण्याचीही मागणी त्यांच्याकडून होतेय.
प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन विभागाकडून 24 तास हेल्पलाईन सुरु केलीय. काही अडचणी असल्यास प्रवाशांनी त्यावर तक्रार नोंदवावी असं आवाहनही करण्यात आलंय. मात्र भाडेवाढीसाठी संप करुन प्रवाशांना वेठीस धरणा-या आणि संध्याकाळच्या वेळेस जादा भाडेआकारणी करुन प्रवाशांना लुटणा-या मुजोर रिक्षाचालकांवर परिवहन विभाग कारवाई करणार का असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येतोय. सध्या तरी रिक्षाभाडेवाढीमुळं आम्हाला वाली कोण असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.