पाणी आहे, मात्र शेतीसाठी अजिबात नाही

पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

Updated: Apr 23, 2012, 09:32 AM IST

www.24taas.com, धुळे

पाण्याच्या टंचाईमुळे राज्यात दुष्काळ असला तरी धुळे जिल्ह्यात मात्र मुबलक पाणी असूनही टंचाई आहे. तापी नदीपात्रात मुबलक साठा असूनही शेतीला पाणी मिळत नाही ते केवळ योग्य सिंचन व्यवस्थेअभावी. पाणी असून ते मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील सुकवद गावच्या शेतकऱ्यांना अथांग पाणीसाठा असूनही कोरडवाहू शेती करण्याची वेळ आली आहे. शेजारीच तापी नदीपात्रात अथांग पाणीसाठा असूनही इथं कुठल्याच प्रकारची चारी किंवा पाट नसल्याने शेतीपर्यंत पाणी पोचत नाही. तर पाणी लिफ्ट इरिगेशनने उचलावं, तर त्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. बेताचीच परिस्थिती असल्याने हा खर्च करणं छोट्या शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे पिकं समोरच्या पाणीसाठ्याकडे पहात बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

ही परिस्थिती फक्त याच गावची नाही, तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, दोंडाईचा भागातही अशीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. पाटबंधारे विभागही लिफ्ट एरीगेशनसाठी पैसा नसल्याने शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविता येत नसल्याचं खेदाने म्हणत आहेत. धुळे जिल्ह्यात पाण्याची सुबत्ता असली तरी शिंदखेडा तालुका अद्याप तहानलेला आहे. गरज आहे ते चाऱ्या काढून वा सिंचनाचे सुलभ पर्याय तातडीने उपलब्ध करून देण्याची. एरवी दुष्काळावर उपायांसाठी बढाया मारणारे राजकीय नेते यावर तातडीने काही उपाय काढतील का, असा सवाल इथले शेतकरी करत आहेत.