www.24taas.com, जळगाव
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे. या गावात सहा दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. राष्ट्रपतींच्या सूनबाई, भावजयी आणि नातीलाही पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.
महाराष्ट्राला गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळाने हैराण केले आहे. त्यामुळेच अनेक मंत्र्यानी या दुष्काळी भागात दौरे केले. मात्र त्यातून काहीही साध्य झालेलं नाही. केवळ विदर्भच नाही तर खांदेश-मराठवाडा भागात दुष्काळाची छाया पसरली आहे. त्याचे पडसाद मात्र अवघ्या महाराष्ट्रात दिसायला सुरुवात झाली होती. कृषीमंत्र्यानी राज्यपालांनी दौरा केला नाही अशी टिका केली तर मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या कोर्टात चेंडु टोलावला होता.
मे महिना अजुन उजाडायचाय पण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दुष्काळ पसरला आहे. या दुष्काळाचं संकट शेतकऱ्यांसमोर आ वासुन उभं आहे. आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचे नेते अशा वल्गना करणारे नेते आता बळीराजाला विसरले आणि दुष्काळावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करण्यात मग्न आहेत. त्यामुळे देशाच्या पहिल्या नागरिकांच्या नातेवाईंकांनासुद्धा पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. तर सामान्याची काय अवस्था असेल हे सागांयलाच नको.