www.24taas.com, लंडन
अनुज बिडवेच्या स्मरणार्थ लँकास्टर विद्यापीठ शिष्यवृत्ती सुरु करणार आहे. अनुज बिडवेची युनायटेड किंग्डममध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती त्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शोक आणि संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
अनुज सारख्या गुणवान विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे तो कायम आठवणीत राहील असं लँकास्टर विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सलर प्रोफेसर मार्क इ. स्मिथ यांनी म्हटलं आहे. पुण्याचा अनुज बिडवे लँकास्टर विद्यापीठात अभियांत्रिकीमध्ये पद्व्युत्तर शाखेचा विद्यार्थी होता. अनुजची वर्णद्वेषातून एका माथेफिरुने सालफोर्ड इथे २६ डिसेंबरला हत्या केली.
पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी शाखेत एमएस्सी करण्यासाठी अनुज बिडवेच्या नावे वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीमध्ये वार्षिक फी आणि होस्टेलचा खर्चाच्या रक्कमेचा समावेश आहे. बिडवे कुटुंबियांच्या इच्छेनुसार शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली आहे असं वृत्तं बीबीसीने दिलं आहे. विद्यापीठानुसार पहिला विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑक्टोबर २०१२ मध्ये लँकास्टरमध्ये दाखल होणं अपेक्षित आहे.
अनुज बिडवेच्या हत्येप्रकरणी सायको स्पालटचन नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका वीस वर्षीय माथेफिरु मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि त्या खटल्याची सुनावणी २० मार्च रोजी होणार आहे. अनुजच्या हत्येत सहभागी असल्या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली होती त्यांना मार्चपर्यंत जामीन देण्यात आला. अजुन एक एकोणीस वर्षीय अटक करण्यात आलेल्या संशियाताचा जामीन रद्द करण्यात आला. अनुज ख्रिसमसच्या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत ग्रेटर माँचेस्टरला फिरायला गेला असताना त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.