तोडफोड, दरोडो... भय इथले संपत नाही...

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला... पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात आज पहाटे ३ ते पाचच्या दरम्यान सुमारे ४० चार चाकी गाड्यांची अज्ञात इसमांनी तोडफोड केली.

Updated: Jul 3, 2012, 09:00 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला... पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात आज पहाटे ३ ते पाचच्या दरम्यान सुमारे ४० चार चाकी गाड्यांची अज्ञात इसमांनी तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली. या प्रकरणी अजून एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. पिंपरी-चिंचवडच्या मेहेत्रे वस्ती भागात अज्ञातांनी असा हैदोस घातला.

 

एक नाही दोन नाही तर तब्बल ४० गाड्या फोडल्या गेल्या. रस्त्याच्या बाजूला लावलेल्या, पार्किंग मधल्या गाड्या फोडण्यात आल्या. हे कृत्य कुठल्या तरी मनोरुग्णानं केलं असावं असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी लवकरच आरोपीना अटक करू असा दावा पोलीस करत आहेत. पोलिसांचा हा दावा स्थानिक  नागरिकांना मान्य नाही. काही तरुण टेम्पो मध्ये आले आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप  नागरिक करत आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये एवढी दहशत बसली की ते कॅमेऱ्यासमोर बोलायलाही तयार झाले नाही.

 

आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली. सलग दहा दिवसांत दहा हत्या.... गोळीबाराच्या घटना, दरोडे आणि चोरीच्या घटना यामुळं पिंपरीशहर आधीच हादरून गेल असताना पुन्हा झालेल्या या तोडफोडीच्या घटनांमुळं नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरलीय. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरतायेत. आठवड्याभारापुर्वीच शहाजी उमप यांनी उपायुक्त पदाची सूत्रं हाती घेतली. आता तरी परिस्थिती बदलेल या आशेवर पिंपरीकर दिवस काढत आहेत.